है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर'
है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर'
नांदेड - येथील सप्तरंगी साहित्य मंडळ आणि प्रज्ञादर्शन शिक्षण संस्था मुदखेड यांच्या संयुक्त विद्यमाने मुदखेड येथे चौथे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन नुकतेच संपन्न झाले. या संमेलनाच्या गझलसंध्या या सत्रात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गझलकारांनी गझलांची सांजवात लावून रंगत आणली. गझलसंध्या सत्रात पालम येथील सुप्रसिद्ध गझलकार आत्तम गेंदे अध्यक्षस्थानी होते. नांदेड व परिसरातील उदयोन्मुख गझलकारांनी आपल्या बहारदार शेर व गझलांनी रसिकांना खिळवून ठेवले व अवघे जनसंवाद साहित्य संमेलन गझलमय झाले. यावेळी स्वागताध्यक्ष प्रविणदादा गायकवाड, निमंत्रक प्रल्हाद हिंगोले, सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे उपाध्यक्ष पांडुरंग कोकुलवार, कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, राज्य सचिव कैलास धुतराज, कोषाध्यक्ष शंकर गच्चे, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर महिला विभाग प्रमुख रुपाली वागरे वैद्य आदींची उपस्थिती होती.
'है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर, लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर' गझलसंध्या सत्राचे सूत्रसंचालक गझलकार चंद्रकांत कदम (सन्मित्र) यांनी शायर दीपक आंगेवारच्या वरील शेराने सुरेल सुरुवात केली. 'ती जुनी डायरी अन् तुझी आठवण, होत जाते गझल रात्रभर रात्रभर..व्यथेला फक्त औषध लागते स्वाती असे नाही,मनाचे दुःख ओसरले तरी रोगी बरा होतो' अशा हटके शेरांनी नांदेडच्या गझलकारा डॉ.स्वाती भद्रे यांनी गझलसंध्येचा आगाज केला व रसिकांची दाद मिळवली. 'मागासलेपणाचा शिक्का जरी कपाळी, माणूसकीत पहिला नंबर मराठवाडा...देऊ नकोस खांदा माझ्या कलेवराला, पुन्हा कुडीत माझ्या येईल प्राण मित्रा' अशा मार्मिक शेरांनी मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठानचा गझलरत्न पुरस्कार प्राप्त नांदेड येथील गझलकार जयराम धोंगडे यांनी उपस्थितांना अंतर्मुख केले. 'मला उचलून घेण्याला पुढे सरसावली आहे, भिमाच्या संविधानाची मिळाली सावली आहे...ते टोकदार नंतर होतात एवढे की, प्रस्तावही फुलांचा फेटाळतात काटे' अशा विद्रोही व दमदार शेरांनी हिमायतनगर येथील धडाडीचे पत्रकार तथा गझलकार विजय वाठोरे यांनी रसिकांची दाद मिळवली.
'वादळी वाऱ्यात..सगळे ठीक आहे ना? आपल्या दोघात..सगळे ठीक आहे ना? सावळी साधी जरी आहेस तू पोरगी आहेस..सांभाळून जा' अशा सध्याच्या अस्वस्थ वर्तमानाचा ठाव घेणाऱ्या देगलूर येथील गझलकारा दीपाली कुलकर्णी यांच्या शेरांनी रसिकांना विचार करायला भाग पाडले. 'संसदेचा या तमाशा पाहवेना,ती अचानक पेटली तर काय जाते? मृत्यू असा मिळावा पाषाण गहिवरावे, यमही कबूल व्हावा उचलून चूक केली!' अशा सटीक शेरांनी हिमायतनगर येथील उदयोन्मुख गझलकार विजय धोबे यांनी रसिकांना निःशब्द केले. 'गझलकार लेखक कवी बिवी काहीच नको, म्हणा लेकरू मला भिमाचे विषय संपला...ललकारण्याआधी मला लक्षात ठेवा, आंबेडकर माझ्यामधे लोडेड आहे...जुलमी उभी व्यवस्था नाकारतो म्हणूनच, जयभीम शोषितांचा आवाज होत आहे' अशा धगधगत्या विद्रोही शेर व गझलांनी सूत्रसंचालक चंद्रकांत कदम (सन्मित्र) यांनी रसिकांची दाद मिळवली व बहारदार सूत्रसंचालनाने रसिकांना खिळवून ठेवले.
गझलसंध्या अध्यक्ष आत्तम गेंदे यांनी "येता जाता" ही आपली सिग्नेचर गझल सादर केली. 'ओलाव्याने विस्तव विझतो खोटे आहे, ती भिजल्यावर आग लावते येता जाता...कर्मकांडातुनी मुक्त केले मला, वैद्य मज भेटला गौतमासारखा...मानतो आम्ही गुलामीलाच आझादी वगैरे शक्य नाही, आमच्याने कोणती क्रांती वगैरे' उपस्थित रसिकांच्या वन्स मोअरच्या उत्स्फूर्त प्रतिसादात अशा आपल्या एकाहून एक सरस शेर व गझलांनी प्रख्यात गझलकार आत्तम गेंदे यांनी गझलसंध्या सत्राचा दमदार समारोप केला व रसिकांना मंत्रमुग्ध केले.चौथे जनसंवाद राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन गझलसंध्या मुळे यादगार ठरले यात शंका नाही. या सत्राच्या यशस्वीतेसाठी सप्तरंगी साहित्य मंडळ आणि प्रज्ञादर्शन शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी अनेक रसिक प्रेक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0