श्रीकिशन सोमाणी विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
श्रीकिशन सोमाणी विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
लातूर : येथील अभिनव मानव विकास संस्थाद्वारा संचालित श्रीकिशन सोमाणी विद्यालयात मंगळवारी , दि. ४ मार्च २०२५ रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयातील इयत्ता बालवर्गापासून ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यावेळी आकर्षक प्रयोग सादर करून उपस्थित मान्यवरांची दाद मिळवली.
या कार्यक्रमाचे उदघाटन महेश बिलुगुडी ( जी.ए. मुख्य व्यवस्थापक, लातूर - धाराशिव महानगर गॅस ) तथा विद्यालयाच्या शालेय समितीचे प्रमुख अतुल देऊळगावकर यांच्या हस्ते नोबेल पारितोषिक विजेते सर डॉ. सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी लातूर महानगर गॅसचे मार्केटिंग ऑफिसर रोहित बाहेती यांचीही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. चेतन सारडा, सचिव कमलकिशोर अग्रवाल, संचालक लक्ष्मीकांत सोमाणी, मुख्याध्यापक रमाकांत स्वामी आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती. सर्वसामान्यांपर्यंत विज्ञानाचे महत्व पटवून देण्यासाठी प्रतिवर्षी विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या कार्यक्रमात डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेचे यशस्वी विद्यार्थी समर्थ कल्याण गिरवलकर, अथर्व संतोष मोरे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना महेश बिलुगुडी यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या विषयावर लक्ष केंद्रित करावे असे मत व्यक्त केले. आपल्या आवडीच्या विषयाच्या ज्ञानाने व्यक्ती परिपूर्ण होत असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वंकष ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करावा. सीएनजी विषयी त्यांनी अतिशय मौलिक माहिती दिली. कोणत्याही प्रकारचे ज्ञान संपादन करण्यासाठी ज्ञानार्जनाची जिज्ञासा असणे खूप आवश्यक असते, असे सांगून त्यांनी आपल्यातील विद्यार्थ्यांमधूनही डॉ. सी.व्ही. रमण, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारखे शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. रोहित बाहेती यांनी यावेळी बोलताना, विज्ञान आणि तंत्रज्ञानात आज आपण फार पुढे गेलो आहोत. आता एआय चा ट्रेंड आला आहे. मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया सारख्या प्रयोगानंतर भविष्यात आणखी चांगले प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनीही आतापासूनच तयारीला लागले पाहिजे, असे सांगितले.
ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना , विज्ञान मधले वि काढल्यास फक्त ज्ञान उरते. हे ज्ञान प्रत्येकाला मिळावे यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे नमूद केले.
आपल्याला कोणते प्रश्न पडत असतात, त्यावर आपण घडत असतो. डॉ. सी.व्ही. रमण यांनी भारतीय विज्ञानाचा पाया रचला. त्याकाळी कोणतीही उपलब्धी नसताना त्यांनी हे साध्य केले. वैज्ञानिक जाणीव, वैज्ञानिक दृष्टी म्हणजे काय हे आपल्याला सांगता आले पाहिजे. आज आपण हवामान बदलाच्या युगात आहोत. त्यासाठी २०५० ते २०६० पर्यंत जगातली ऊर्जा चांगली असली पाहिजे, असे प्रयत्न सुरु आहेत. भारतात २०३० पर्यंत पाचशे गिगावॅट एवढी स्वच्छ ऊर्जा निर्माण करायची आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध प्रयोगांबद्दल त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रमाकांत स्वामी यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी या उपक्रमाच्या आयोजनामागची पार्श्वभूमी विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा भोसले यांनी तर आभार प्रदर्शन संदीप मेळकुंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक रमाकांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक गिरीश कुलकर्णी, राहुल पांचाळ, सौ. सुनीता जाधव यांच्यासह सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0