बोलीभाषा व्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम
बोलीभाषा व्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम
साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांचे प्रतिपादन;
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कौटुंबिक न्यायालयात कार्यक्रम
नांदेड - बोलीभाषेतील साहित्य, मराठी भाषा शिकण्याचा प्रचार जुन्या काळात झाला, त्यामुळे नव्या समाजातील लोक शिकत गेले आणि समाजात प्रतिबिंब दिसून आले. मराठी भाषा संवर्धनाच्या बाबतीत विचार केला तर मराठी ही बोलीभाषेमुळेच समृध्द होऊ शकते. बोलीभाषेमध्ये जनसामान्यांची आस्थाच नव्हे तर भावना सुध्दा जुळलेली असते. त्यामुळे बोलीभाषा व्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम आहे असे प्रतिपादन येथील साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांनी केले. ते नांदेडच्या कौटुंबिक न्यायालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश एस. पी. अग्रवाल, अभिवक्ता संघाचे अध्यक्ष शिवाजी वडजे, समुपदेशक ज्योती सपकाळे, अॅड. विजय गोणारकर, सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे यांची उपस्थिती होती.
मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार मराठी भाषा विभागाने यावर्षी मराठी भाषेसंदर्भात विविध कार्यक्रम मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात आयोजित करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. तसेच त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारितील सर्व कार्यालये तसेच सार्वजनिक उपक्रम यांनी मराठी भाषेचा करणे अनिवार्य आहे. राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” म्हणून साजरा करण्याबाबत सर्व कार्यालयांना निर्देशित केले आहे. या निर्देशानुसार कौटुंबिक न्यायालयात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ढवळे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, बोलीभाषा जनसामान्यांच्या मनातून पुढे येत असल्याने आणि त्या बोलीभाषेमुळेच मराठी साहित्याला व्यापक स्वरुप आले आहे. बोलींचा प्रभाव हा खोलवर असून त्याचा प्रभाव मराठी साहित्यावर स्पष्टपणे जाणवतो. ज्या बोलीभाषेतील शब्दसंपदा विपुल असते ती भाषा समृद्ध असते. न्यायालयाचे कामकाज १०० टक्के मराठीतून झाले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली
अध्यक्षीय समारोप करताना न्यायाधीश अग्रवाल यांनी पक्षकारांशी बोलताना मराठीत बोलणे कमीपणाचे समजू नये. कोणतेही दावे, प्रकरणांचे दस्तऐवज हे मराठीतच तयार करावेत. न्यायालयातील वादविवादही मराठीत असले पाहिजेत. कारण इथे सगळेच मराठी बोलणारे आहेत. आम्ही न्यायनिवाडे देखील मराठीत असावेत हे कटाक्षाने पाळतो आहोत. तेव्हा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी शुद्ध मराठीत बोलण्याचाही प्रयत्न करावा असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. शिवाजी वडजे यांनी केले. सूत्रसंचालन अॅड. संतान यांनी केले तर आभार ज्योती सपकाळे यांनी मानले. यावेळी न्यायालय परिसरातील विविध विधिज्ञांची व कर्मचारी महिला पुरुषांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0