मुंबईला प्रदूषणाचा विळखा
मुंबईला प्रदूषणाचा विळखा
महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई आता प्रदूषणाचीही राजधानी बनू लागली आहे. मुंबईतील प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मागील काही दिवसात मुंबईतील हवेचा दर्जा अतिशय खराब नोंदवला गेला त्यामुळे दिल्ली पाठोपाठ आता मुंबईही सर्वाधिक प्रदूषित शहर बनले आहे. अर्थात ही काय भूषणावह बाब नाही उलट यामुळे महाराष्ट्राची मान खाली झुकली आहे अर्थात त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही मुंबईतील प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाय करा असा अनेक सामाजिक व सेवाभावी संघटनेने सरकारला इशारा दिला होता मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. केवळ मुंबईचं नाही तर मुंबईसह राज्यातील काही शहरांच्या हवेचा दर्जा देखील खराब श्रेणीत नोंदवला गेला आहे. गेल्या काही दिवसाासून मुंबई शहरावर धुळीची चादर पसरली आहे. पश्चिम आशियातून येणाऱ्या धुळीच्या वादळाचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र मुंबईतील प्रदूषणाचे केवळ हेच एकमेव कारण आहे असे नाही. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला इतर अनेक घटकही कारणीभूत आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे मुंबई करांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे मुंबई करांची चिंता वाढली आहे.
मागील वर्षी स्विस संस्था आयक्युएअरने जागतिक प्रदूषणावर एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीत भारतातील दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई यासारख्या मोठ्या आणि महत्वाच्या शहरांचा समावेश होता. या शहरात वातावरणातील प्रदूषणकारी घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पीएम - २.५ कणांचे प्रमाण ५३.३ मायक्रोग्राम क्यूबिक मीटर या पातळीवर आले असून ते आरोग्य संघटनेने निर्धारित केलेल्या सुरक्षेच्या पातळीपेक्षा दहापटीने अधिक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले होते.
आज देशातील सर्वच महत्वाची शहरे प्रदूषणाने गुदमरत आहेत. त्या शहरात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन प्रदूषणामुळे धोक्यात आले आहे. एकीकडे २१ व्या शतकातील सुखासीन जीवनाचे मनोहरी चित्र उभे केले जात आहे. स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवले जात आहे तर दुसरीकडे याच शहरांची फुफ्फुसे प्रदूषणाने निकामी होत आहेत. प्रदूषणामुळे या शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषणामुळे या शहरातील नागरिकांना फुफ्फुसाचे, हृदयाचे, रक्ताभिसरणाचे आजार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. न्यूमोनिया, पक्षघात, हृदयविकार, फुफ्फुसाचा कर्करोग यासारखे मोठे आजार प्रदूषित हवेमुळेच होत आहेत. प्रदूषणामुळे दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीची किती वाईट अवस्था झाली आहे हे आपण पाहत आहोतच. प्रदूषणामुळे दिल्लीतील शाळा कॉलेजसना सुट्टी देण्याची वेळ प्रशासनावर येते. चार वर्षांपूर्वी दिल्लीत इंग्लंड आणि भारत यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात खेळाडू चक्क मास्क लावून मैदानात उतरले होते. नंतर हा सामना देखील प्रदूषणामुळे रद्द करावा लागला होता त्यामुळे भारताची जगात नाचक्की झाली होती. जे दिल्लीत आहे तेच मुंबईत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई प्रदूषणाच्या बाबतीत आता देशाच्या राजधानीची बरोबरी करू लागली आहे. मुंबईचे प्रदूषणही उच्चतम पातळीवर पोहचले आहे.
प्रदूषणामुळे लोकांना शुद्ध हवा मिळणे दुरापास्त झाले आहे. शुद्ध हवेसाठी लोकांना पैसे मोजावे लागत आहे. मुंबई - दिल्लीसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात ऑक्सिजन बार सुरू करण्यात आले आहेत. एका तासाला २०० ते ५०० रुपये मोजून नागरिक ऑक्सिजन विकत घेत आहेत. इतके होऊनही आपण त्यातून बोध घेत नाही. या मोठ्या शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरात लोकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या अधिक आहे. वाढत्या वाहनांमुळे प्रदूषणात भर पडत आहे. वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरात प्रदूषणाचे प्रमाण खूप असते. धूळ, कारखान्यातून निघणारा धूर, बांधकामातून पसरणारे कण, वृक्षतोड, पृथ्वीचे वाढते तापमान, प्लास्टिकचा भस्मासुर अशा अनेक कारणांमुळे प्रदूषणाचा आलेख उंचावत आहे.
वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी वेळीच ठोस उपाय करायला हवेत. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरातून प्रदूषणकारी घटक कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. दगड खाणींवर नियंत्रण आणायला हवे. वाहनांची संख्याही कमी करायला हवी. प्रसंगी सम - विषम सारखे कठोर निर्णय घ्यायला हवेत. बांधकामांवर नियंत्रण आणायला हवे. युरोपीय देशात प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात याचा अभ्यास करायला हवा. नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. याशिवाय कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि विल्हेवाट तसेच सौरऊर्जेच्या वापरावर भर द्यायला हवा. वृक्षारोपण करुन ते वृक्ष जगवले पाहिजेत. शासन, प्रशासन आणि नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच प्रदूषणाचा हा भस्मासुर रोखता येईल.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025Your experience on this site will be improved by allowing cookies.
Comments 0