४ थे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन, मुदखेड
४ थे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन, मुदखेड
दि.२७ जानेवारी २०२५, संमेलनाध्यक्ष डॉ. जगदीश कदम यांचे अध्यक्षीय भाषण
चौथ्या जनसंवाद साहित्य संमेलनाचे उद्घाटक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा आपल्या भागाचे भाग्यविधाते मा.खा.अशोकरावजी चव्हाण,भोकर विधान सभेच्या नवनिर्वाचित आमदार अँड.श्रीजयाताई चव्हाण, आ.राम रातोळीकर, स्वागताध्यक्ष प्रवीण गायकवाड, भूतपूर्व अध्यक्ष कवी अनंत राऊत, प्रमुख पाहुणे मा.तहसिलदार, मा.पोलीस निरीक्षक, मा.गटशिक्षणाधिकारी, मा. मुख्याधिकारी,
विचारवंत डॉ.अनिल काळबांडे, सप्तरंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, जिल्हाध्यक्ष रणजीत गोणारकर आणि त्यांचे सर्व सहकारी, प्रज्ञा दर्शन संस्थेचे सर्व पदाधिकारी, मंचावरील सर्व मान्यवर, उपस्थित साहित्यिक,कवी, पत्रकार आणि साहित्यप्रेमी बंधू भगिनींनो,
चौथ्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संयोजन समितीने माझी निवड केली त्याबद्दल संयोजकांचे खूप खूप आभार. खरे तर या साहित्य संमेलनाचे आधीचे अध्यक्ष तुलनेने तरूण आहेत. अनुरत्न वाघमारे आणि राम वाघमारे हे उत्तम सर्जक असून ते माझे विद्यार्थी आहेत. या संमेलनाचे भूतपूर्व अध्यक्ष अनंत राऊत हे मराठीतील मान्यवर कवी आहेत. ते सुध्दा तरूण आहेत. त्यामुळे यांच्याच पिढीतील युवा साहित्यिक या संमेलनाचे अध्यक्ष असायला हवे होते, असे मला वाटते. वर्तमान व्यवस्थेविषयी नव्या पिढीला काय वाटते हे या निमित्ताने समजून घेता येते. त्यामुळे माझ्या सारख्या आधीच्या पिढीतील माणसाचे विचार हे काहीसे अनाक्रमक वाटण्याची शक्यता आहे. मी इथे आलो आहे ते माझे लाडके विद्यार्थी प्रवीण गायकवाड यांच्या आग्रहाखातर. काही वर्षांपूर्वी देशाचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून मुदखेड येथे त्यांनी भव्य कवी संमेलनाचे आयोजन केले होते. या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांनी माझी निवड केली होती. स्वर्गीय अटलजी हे कवींचे कुलगुरू. त्यांच्यातील राजकारणी जितका बहुमुखी होता तितकाच कवीही चतुरस्त्र होता. त्यांच्या कविता ऐकणं हा खरोखरच खूप सुखावून टाकणारा आणि समृद्ध अनुभव असे.
या संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचा मला फोन आला. ते म्हणाले एकदा तुम्ही टाळले. आता टाळता येणार नाही. प्रवीण हे आमच्या यशवंत महाविद्यालयात असताना भाषणाचे अनेक फड त्यांनी गाजवले. मी विद्यार्थी संसदेचा प्रभारी असल्यामुळे जेथे शक्य आहे तेथे मी त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला. खरे तर निसर्गाने त्यांच्यावर काही शारीरिक मर्यादा टाकलेल्या आहेत. परंतु त्यामुळे ते खचून गेले नाहीत.त्याचा त्यांनी कधी बाऊ केला नाही. आपल्यात कसल्याही प्रकारचे न्युनत्व येऊ दिले नाही. आपले विचार स्पष्टपणे मांडणे आणि समोरच्या व्यक्ती अथवा जमावाला प्रभावीत करणे हे कौशल्य त्यांनी अवगत केले. ते ज्या संघटनेत गेले तेथे याच कौशल्याच्या बळावर त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. आज त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात जी प्रगती केलेली आहे, ती खरोखरच नव्या पिढीला प्रेरणादायी ठरणारी आहे.अशा विद्यार्थ्याने दिलेले निमंत्रण कुठल्याही सबबीवर टाळणे मला शक्य नव्हते. हे साहित्य संमेलन प्रज्ञा दर्शन शिक्षण संस्था आणि सप्तरंगी साहित्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले आहे. सप्तरंगी साहित्य मंडळाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी साहित्यिक उपक्रम घेऊन नवोदित कवी, लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे. या मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष अनुरत्न वाघमारे आणि संयोजन समितीचे नागोराव डोंगरे, पांडुरंग कोकुलवार, कैलास धुतराज, मारोती कदम, शंकर गच्चे, रणजीत गोणारकर, चंद्रकांत कदम, रूपाली वागरे, जयश्री फुलारी, बाबुराव पाईकराव, प्रज्ञाधर ढवळे, दत्ता हरी कदम, गजानन देवकर, गौतम कांबळे, प्रकाश ढवळे, प्रल्हाद घोरबांड, पंडित पाटील, राहुल जोंधळे या सगळ्यांचे मी आरंभीच आभार मानतो.
मित्रहो,
ज्या मंडळाचे नाव आहे सप्तरंगी आणि संमेलनाचे नाव आहे जनसंवाद. या दोन्ही गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात. विविध रंगांची महती सांगणारे हे मंडळ आहे. आपला भारत देश अशाच वैविध्याने नटलेला. अनेक जाती,धर्माचे लोक आपल्या देशात गुण्यागोविंदाने राहतात. भाषा, संस्कृती, वेशभूषा, चालीरीती, सणवार, लोकप्रथा, लोकाचार अशा अनेक बाबतीत भिन्नता असलेले समाज समूह आपल्या देशात राहतात. या सगळ्या समुहांना एकत्र बांधण्याची खुबी जगाच्या पाठीवर केवळ आपल्या देशात आहे.बाहेरून बहुरंगी असूनही अंतरंगी एक असलेल्या देशात आपण राहतो,याचा सार्थ अभिमान आपणास असायला हवा. मित्रहो, या साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.अशोकराव चव्हाण उपस्थित राहिले, हा सुद्धा औचित्याचा भाग आहे. चव्हाण साहेबांचा जनसंवाद उत्तम आहे.सर्वसामान्य माणूस हा विकासाच्या केंद्रस्थानी आला पाहिजे असे त्यांना नेहमीच वाटत आलेले आहे.नांदेड जिल्ह्यातील अनेक विकास कामे त्यांनी मार्गी लावली.त्यासाठी अधिकाधिक निधी कसा उपलब्ध करून देता येईल हे पाहिले.आज मराठवाड्यात आलेला माणूस आपल्या भागातील रस्ते, विकास पाहून अचंबित होतो.हे सारे चव्हाण साहेबांमुळे शक्य झाले ही गोष्ट आता झाकून राहिलेली नाही. या भागाचा कायापालट झाला पाहिजे असे स्वर्गीय शंकररावजी चव्हाण यांना सतत वाटत असे.त्यासाठी त्यांनी नियोजनबद्ध कार्यक्रम आखले.मुदखेड येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे प्रशिक्षण केंद्र आणले.कृष्णूर येथे मोठी औद्योगिक वसाहत उभारली.दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय कार्यालय नांदेडला आणले.विष्णुपुरी येथील आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प ही त्यांची स्वप्नपूर्ती होय.या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती कायम जिवंत राहतील यात वाद नाही.
मित्रहो,
आज आपण जनसंवाद साहित्य संमेलनाच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत.दिवसभर साहित्य आणि समाज या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत.कथा, कविता ऐकविणार आहोत.साहित्य संमेलने खूप वर्षांपासून आपल्याकडे भरतात.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची शतकाकडे वाटचाल सुरू आहे.तो दिवसही जवळ येऊन ठेपलेला आहे.या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला हे चांगले झाले.कोणत्याही निमीत्ताने का असेना आपण जी भाषा बोलतो त्या भाषेचा सन्मान होतो आहे,ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.यातून एक गोष्ट स्पष्ट झाली.ती म्हणजे आपणाला बालपणापासून संस्कृत ही मराठीची जननी आहे असे सांगितले जात असे.हा गैरसमज पुसला गेला.आमच्या मराठीला थोर परंपरा आहे.हे सर्वमान्य झाले.मराठी ही आपली मातृभाषा आहे.माणूस प्रभावीपणे व्यक्त होतो आपल्या मातृभाषेतून . मातृभाषा ही थेट आपल्या नेणिवेत दडून बसलेली असते.आपल्या सुख-दुःखात तीच आपले भावविश्व भक्कम करीत असते.विचार,भावनांचा परिपोष करीत असते.आपण आपल्या मातृभाषेला जपलेच पाहिजे.
याचा अर्थ इतर भाषांचा दुस्वास करणे असा मात्र होत नाही.मातृभाषेशिवाय इतर भाषा सुध्दा आपणास यायला हव्यात.महाराष्ट्रीय माणसाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषा लीलया येतात.खेडेगावात राहणारा
मराठी माणूस सुध्दा हिंदीतून उत्तम बोलू शकतो.असे असले तरी जेथे ज्या भाषेची गरज आहे,तेथे ती भाषा बोलायला हरकत नाही.परंतु गरज नसताना सुद्धा आपण परभाषेत बोलतो.हे योग्य नव्हे.मी बाजारात गेलो तर माझा भाषा व्यवहार मराठीतूनच व्हायला काय हरकत आहे.परंतु असे होताना दिसत नाही.घराबाहेर पडल्यानंतर रिक्षावाला असो अथवा भाजीपाला विकणारा असो त्याच्याशी हिंदीतून बोलण्याचा मोह टाळता येत नसेल तर आपल्या सारखे करंटे आपणच.एकीकडे मराठी भाषेचे भवितव्य धोक्यात आहे असे म्हणून कंठरव करायचा आणि दुसरीकडे आपणच त्या भाषेची हेळसांड करायची.याचा आपण गंभीरपणे विचार करायला हवा.
दुसरी गोष्ट - भाषेच्या बाबतीत आपण फारच टोकदार आणि कठोर असणे गरजेचे नाही.माझा नातू इंग्रजी शाळेत जातो म्हणून मी फार मोठा अपराध करतो आहे असे नव्हे.काळाची गरज म्हणून काही गोष्टी आपण स्विकारायला हव्यात.इंग्रजी ही पाहुण्यांची भाषा असली तरी जगभरातील व्यवहार याच भाषेने खांद्यावर घेतलेले आहेत.सर्व प्रकारच्या ज्ञानाची वाहक म्हणून या भाषेचे महत्त्व आपणास नाकारता येणार नाही.क्रांतीवीर महात्मा जोतीराव फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांनी सुध्दा इंग्रजी शिक्षणाविषयी स्वागतशीलता दाखविली होती.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बहुतेक ग्रंथ इंग्रजी भाषेतील आहेत.तात्पर्य आपल्या मातृभाषेचा सार्थ अभिमान तर आपण ठेवायलाच हवा.त्यासाठी अन्य भाषांचा दुस्वास करण्याची गरज नाही.
मित्रहो,
या साहित्य संमेलनात कथाकथन,कवीसंमेलन ठेवलेले आहे.त्यासोबतच संविधान या आपल्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर परिसंवाद ठेवलेला आहे.संविधान हा भारतीय माणसाचा श्वास आहे.संविधानामुळे देशातील विविध जाती, धर्मातील लोक परस्परांना जोडले गेले आहेत.भारतीय संविधानाचा लाभ येथील प्रत्येक माणसाने घेतलेला आहे.त्यामुळे संविधानावरील स्वतंत्र परिसंवाद ही या संमेलनाची भारदस्त बाजू आहे. मित्रहो, एकेकाळी सहीत म्हणजे साहित्य असे म्हटले जायचे.समाजाचे हीत पाहाते ते साहित्य अशी साहित्याची व्याख्या केली जायची.पूर्वी आणि आजही 'स्वान्त सुखाय 'साठी साहित्य लिहिले जायचे.आनंदाचे डोही आनंद तरंग.म्हणजे आनंदासाठी साहित्याची निर्मिती होते आणि आनंदासाठीच ते वाचले जाते असे समजले जात असे.भारतीय साहित्यशास्रात साहित्याची अनेक प्रयोजने सांगितली गेली आहेत.त्यापैकी बरीच कालबाह्य झालेली आहेत.आनंद देणे हा कुठल्याही कलेचा उद्देश असतो.त्याच प्रमाणे व्यापक जीवनदर्शन घडविणे हा सुद्धा आणखी वेगळा हेतू असतो.साहित्य केवळ करमणूक अथवा मनोरंजनासाठी नसून मानवी जीवनाचा पट उलगडून दाखविण्याचे सामर्थ्य त्यामध्ये असते.जे साहित्य माणसाला केंद्रबिंदू मानते तेच श्रेष्ठ असते.ही बाब आता जगभरातील साहित्य विश्वाने मान्य केलेली आहे.आपल्याकडे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिप्रवण विचारातून दलित साहित्य उदयाला आले.दलित साहित्यातून उपेक्षित, वंचित आणि अभावग्रस्त माणसाचे जगणे आले.अशा प्रकारचे जगणे मराठी साहित्यात पहिल्यांदाच येत असल्याने या साहित्य प्रवाहाचे जोरदार स्वागत झाले.दया पवार,प्र.ई.सोनकांबळे,लक्ष्मण गायकवाड यांच्या पासून रविचंद्र हडसनकर अशा कितीतरी लेखकांची एकापाठोपाठ एक आत्मकथने आली.या आत्मकथनांमधून दलित,शोषित माणसांच्या जगण्याची वाताहत, कुचंबना,चढ उतार, सुख- दुःख आले. मराठी वाचकांना हे जीवनदर्शन नवे होते.त्यामुळे या जीवनदर्शी साहित्याचा मोठा वाचकवर्ग निर्माण झाला.सप्तरंगी साहित्य मंडळ आणि आजचे जनसंवाद साहित्य संमेलन ही त्याचीच फलश्रुती आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
दलित -ग्रामीण नवा प्रवाह -
मित्रहो,
दलित आणि ग्रामीण साहित्य हे परस्परांना पूरक आहे.ग्रामीण साहित्यातून शेतकरी आणि कष्टकरी समाजाचे चित्रण प्रामुख्याने आलेले आहे.१९६० नंतर हे चित्रण ठसठशीतपणे आल्याचे आपणास दिसून येते.या आधीचे चित्रण काहीसे करमणूक प्रधान आणि वरवरचे होते,हे मान्य करायला हवे.
पूर्वी ग्रामीण माणूस हा बावळट ,वेंधळा आणि अडाणी समजून त्याच्या वागण्या,जगण्यावर विनोद निर्मिती केली जात असे.
खेड्यातील माणूस शहरात आल्यावर खराखरा अंग खाजवतो.बावळटासारखा उंच उंच इमारतींकडे पाहतो.अशी वर्णने ग्रामीण साहित्यातून आलेली आहेत.ग्रामीण माणसाच्या आरोग्याचे प्रश्न आहेत.त्याच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत.हे मात्र आपण सोयिस्करपणे विसरतो. ग्रामीण भागातील पाटलाचे चित्रही असेच बेगडी आहे.वरवरचे आहे. 'बाई वाड्यावर ये' असे म्हणणारा पाटील चित्रपटातून आलेला आहे.नदीवर अथवा ओढ्यावर नायक नायिका एकत्र येतात आणि त्यांचे पाच मिनिटात प्रेम जुळते.हे कितपत शक्य आहे?
पूर्वीच्या ग्रामीण साहित्यात योगायोगांचा भरणा दिसतो. आजची पिढी मात्र अत्यंत सजगपणे बदलत्या ग्रामीण जीवनाचे चित्रण करताना दिसते.
मराठी शाळांची दुरवस्था -
ज्या मराठी शाळांमधून आमची पिढी शिकली त्या शाळांची आज मोठ्या प्रमाणात पडझड होताना दिसते.याला शासनाची उदासिनता जेवढी कारणीभूत आहे तेवढीच पालकांची फाजील महत्वाकांक्षा आहे.आम्ही आमच्या पाल्यांना मराठी शाळांऐवजी इंग्रजी शाळांमध्ये टाकतो.केवळ एखादी भाषा येणे म्हणजे ज्ञान संपादन करणे नव्हे.मराठी शाळांतून शिक्षण घेतलेले अनेक मातब्बर संशोधक आपल्याकडे आहेत.शासनाने शालेय स्तरावर मातृभाषेला अग्रक्रम दिलेला असला तरी आमच्या डोक्यातील इंग्रजीचे फँड कमी व्हायला तयार नाही.याचे परिणाम काय होतील ते येणारा काळच ठरवेल.
वाचन संस्कृती
गाव तेथे ग्रंथालय -खरे तर वाचन संस्कृती वाढली पाहिजे.वाचनाने माणूस समृध्द होतो.जगण्यासंबंधीच्या धारणा पक्क्या होतात.वैचारिक परिपक्वता येते.त्यासाठी वाचनासाठी आवश्यक असलेली पुस्तके,ग्रंथ गावपातळीवर उपलब्ध करून द्यायला हवीत.त्यासाठी गाव तेथे ग्रंथालय ही संकल्पना प्रत्यक्षात आणायला हवी.मुलांच्या हातातील मोबाईल काढून त्यांच्या हातात पुस्तके देण्याचे फार मोठे आव्हान शिक्षक,पालक आणि समाजावर आहे.अन्यथा येणाऱ्या शे-पन्नास वर्षांत या पिढीचे काय होईल.ते सांगणे कठीण आहे.
शेतकरी आत्महत्या -
शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा आपल्या येथील ज्वलंत प्रश्न आहे.शेतीचे गणित आता पूर्वीसारखे राहिलेले नाही.मुक्त अर्थव्यवस्थेत सर्वात जास्त उघडा पडलेला घटक म्हणजे शेतकरी.तो का उघडा पडला याची कारणमीमांसा गंभीरपणे झाली पाहिजे.सामान्यपणे सत्तेत असलेल्या लोकांकडे शेती असतेच.त्यांना शेतीच्या प्रश्नांची जवळून जाणीव असते.तरीही तोडगा का निघत नसेल.हा गहन प्रश्न आहे.मी एक साधे उदाहरण देतो.एके काळी एक क्विंटल कापूस विकून एक तोळा सोने विकत मिळायचे.आज एक तोळा सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतात आणि एक क्विंटल कापसाला किती पैसे लागतात याचे साधे गणित करून पाहा.हे गणित लागत नाही म्हणूनच मिनकी सारख्या गावातील शेतकरी कुटुंबातील बाप लेकांना दोरखंडाला लटकून जीवन संपवावे लागते.
ही मोठी गंभीर बाब म्हटली पाहिजे.
जनसंवाद महत्त्वाचा-
मित्रहो,
आपल्या ग्रामीण साहित्य संमेलनाला जनसंवाद हे नाव दिलेले आहे.मला वाटते हे नाव नव्या कालगतीचे सूचन करणारे आहे.आज मोबाईल संस्कृती आलेली आहे.मोबाईल नावाच्या छोट्याशा यंत्राने माणसाला विळखा घातलेला आहे.हा विळखा विषारी नागिणीपेक्षाही भयंकर आहे.नागिण थकली म्हणजे विळखा सैल होण्याची शक्यता संभवू शकते.परंतु मोबाईलच्या नादी लागलेला माणूस असो अथवा शाळकरी मुलगा असो मोबाईलचा लळा काही केल्या सुटत नाही.मोबाईलच्या वाढत्या आक्रमणामुळे माणसामाणसातील संवाद तुटत चालला आहे.हा संवाद राहिला तरच माणूस जिवंत राहू शकेल.संवादाचा झरा बंद झाला तर माणूसकीचा प्रवाह आटून जायला वेळ लागणार नाही. समाजाच्या बोथट होत चाललेल्या संवेदना ताज्या करणे हे साहित्याचे काम आहे. जनसंवाद साहित्य संमेलनाच्या माध्यमातून हेच काम आमचे प्रवीण गायकवाड आणि अनुरत्न वाघमारे यांच्या सप्तरंगी साहित्य मंडळाकडून होते आहे.ही मोठी आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. आपण मला या संमेलनाचे अध्यक्षपद देऊन सन्मानित केले त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो.
Like
Dislike
Love
Angry
Sad
Funny
Wow
दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लातूर येथे 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
January 30, 2025
Comments 0